Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/11/24

रत्नागिरी

मीराच्या प्रवासातील पहिला मुक्काम सांगली होता. ती सांगली सोडते आणि प्रवास पुढे सुरू होतो, तेव्हा पुढे तिला काही बऱ्यावाईट गोष्टींना तोंड द्यावं लागणार होतं. बरेच धक्के पचवावे लागणार होते. हे लेखक म्हणून मला माहिती असल्यानं, पुढे कोणतं गाव निवडावं या विचारासरशी डोक्यात कोकण आलं.
कोकण का...तर अर्थात समुद्र.....
मीरेचा कादंबरीतील प्रवास हा फक्त बाह्य नाही, तर अर्थात आंतरिकसुद्धा आहे. आंतरिक प्रवासात प्रत्येकच व्यक्तीला, मग कोणतेही जेंडर असो, एका टप्प्यावर अस्वस्थतेचा, एकटेपणाचा शाप हा भोगावाच लागतो. ही घालमेल, तडफड अनुभवत असताना, मी स्वतः नेहमी निसर्गाचा आधार घेते. 
2015 मध्ये खूप अस्वस्थतेतून जात असताना, कोकणात पहिल्यांदाच मी एकटीने ट्रीप मारली होती. स्वारगेटला गेले. समोर चिपळूणची बस दिसली, बसले. मग खेड, दापोली, हर्णे, आंजर्ले इथे कधी बसने तर कधी चालत एकटीनेच फिरलेले. हर्णेच्या lighthouse खाली दुपारी झोपले होते. आंजर्ल्याच्या रिकाम्या समुद्र किनाऱ्यावर स्वतःला समुद्राच्या स्वाधीन केलेलं. वाटलेलं, समुद्र मनाच्या सगळ्या जखमा धुवून टाकतो. समुद्राच्या लाटा आपल्याला अंतरबाह्य निर्मळ करून टाकतात. समुद्र माणसाच्या अपुरेपणावर पांघरून घालत, मायेने पोटाशी धरतो.
समुद्राची हीच साथ मला मीरेला अनुभवायला द्यायची होती.
मग 2018 मध्ये कादंबरी लिहायची ठरवले तेव्हा नोकरीतून बिनपगारी रजा घेऊन दहा एक दिवस रत्नागिरीला मुक्काम ठोकला. दिवसाच्या वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळ्या रुपातला समुद्र अनुभवला. समुद्रकिनारीच रिसॉर्टमध्ये राहून जे जे मनात येईल ते लिहित राहिले...तिथेच मीराची नवीन रूपं सापडली. तिची मल्हारबद्दलची आसक्ती. प्रेम. वाट पाहणं. एकटेपणातील भ्रम. सगळं.
कादंबरीत आलेलं रत्नागिरीजवळचं गाव सापडलं. तिथे जाण्याचा आतला आणि बाहेरचा रस्ता सापडला. 
समुद्र भरभरून देतो. आपली जितकी कुवत असेल तितकं घ्यावं. त्याच्यासारखीच काही माणसं पण असतात. प्रेम, माया, मैत्र, सोबत, सगळं सगळं देणारी या जगात खूप माणसे आहेत...आपल्याला आपलं मन शांत करत, ते समजून घेत, स्वीकारता आलं पाहिजे. 
जोपर्यंत ते जमत नाही, तोपर्यंत स्वतः च निर्माण केलेल्या मनाच्या वावटळीमध्ये आपणच भिरभिरत राहतो. मग मनाची भुणभुण थांबवून, मन बथ्थड व्हावे यासाठी एकतर दारू पीत राहायची, चंगळवादी जगत निब्बर व्हायचं, नाहीतर सतत जगावरच कचकच करत राहायची. 
म्हणून वाटतं, आयुष्यात प्रत्येकाने थोडा ठहराव आणावा. Pause घ्यावा. बसावं निसर्गासोबत, स्वतःला समजून घेत. या कादंबरीच्या आत आणि बाहेरही तो ठहराव मला समुद्र आणि हिमालय देत राहतात. 
Between विहिरीची मुलगी मधील सगळी पात्रे काल्पनिक आहेत. फक्त एकच पात्र अगदी खरंखुरं आहे. ते पात्र मला रत्नागिरीच्या रिसोर्टमध्ये भेटलेलं. ते म्हणजे जर्मन शेफर्ड प्रजातीची कुत्री डॉली. माझ्या तिथल्या मुक्कामात ती माझ्या मागे मागेच असायची. ती जशी खरी होती,  मी अगदी तशीच कादंबरीत,तिच्या चाळ्यांसकट लिहीली आहे. लॅपटॉपमध्ये जुने फोटो चाळताना तिचे फोटो सापडले. सोबत डकवते आहे.

3/16/24

सांगली

 विहिरीची मुलगी या कादंबरीतील मीरेच्या प्रवासाची सुरुवात सांगलीपासून होते. याचं कारण सांगलीनं माझ्या मनात कायमसाठी हक्काचं स्थान मिळवलं आहे. MBBS नंतर माझे DGO हे PG झाल्यानंतर, मी 3 महिने सांगलीत होते. 2014 साली बहुतेक. सांगलीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. हेमंत लिमये सर यांना गडचिरोलीतील शस्त्रक्रिया शिबिरात कमी वेळात, कौशल्यपूर्ण सर्जरी करताना मी पाहिलं होतं. तेव्हाच ठरवलेलं की सरांकडे जाऊन गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच Hysterectomy, सरांच्या टेक्निकने शिकून घ्यायची. त्यासाठी मग तीन महिने मी सांगलीत मुक्काम ठोकलेला. सांगलीला शिकलेल्या शस्त्रक्रिया, पुढे जाऊन सास्तूर या ठिकाणी नियमित केल्याने मीही त्यात expert झाले. कारण त्या भूकंपग्रस्त भागात गरीब रुग्णांना अगदी माफक दरात NGO ने चालवलेल्या स्पर्श या जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळायच्या. त्यामुळे गरजू रुग्णांची गर्दी असायची. पुढे छत्तीसगडला माझ्या रुग्णांचे जीव वाचायला ते कौशल्य खूप जास्त उपयोगी आले, तेव्हा मला लिमये सरांच्या प्रती कृतज्ञता वाटलेली. छत्तीसगड सोडताना, तिथल्या इतर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना ते कौशल्य शिकवून मला समाधान वाटले. सांगलीत आणि जयसिंगपूर, शिराळा अशा आजूबाजूच्या गावांत जाऊन शस्त्रक्रिया चालायच्या, त्यामुळे फिरणं व्हायचं. कुठं काय चांगलं खायला मिळतं हे सर आणि सोबतच्या सहकाऱ्यांमुळे डेमोसकट माहिती व्हायचं. काम संपल्यावर संध्याकाळी मी पूर्ण रिकामी असायचे. मग सायकल काढून भटकायला जायचे. कधी सांगलीतील नदीचा घाट तर अनेकवेळा हरिपूरला एकटीने जाऊन बसायचे. सुंदर प्रसन्न जागा पाहून वाटायचं की कोणी बॉयफ्रेंड असता तर त्याला इकडे तिकडे फिरवलं असतं. 2017 मध्ये कादंबरी लेखन सुरु झालं तेव्हा मीराचा पहिला मुक्काम कुठे पडावा या प्रश्नासरशी सांगली आठवलं आणि ते लिहिलं गेलं. सोबतच आला नायक मल्हार. मला आयुष्यात कधीही न भेटलेला. पण हे पात्र लिहिताना मीच त्याच्या प्रेमात पडत गेले. असा मल्हार खऱ्या वास्तवात नाहीये हे स्विकारायला जडच गेलं. काही पात्रं लेखकाचे बोलणे आज्ञाधारकपणे पाळतात, काही लेखकाला पारच धुडकावून लावतात. तर काही लेखकालाच मोहात पाडतात. Anywes तर मागच्या आठवड्यात कोल्हापूरला असताना, वाट वाकडी करून, मीरा मल्हारचे आवडते ठिकाण हरीपूर इथे जायचा मोह टाळता आला नाहीये. ती जागा आता खूप बदलली आहे, पण तिथल्या माझ्या आठवणी अजून तशाच जपलेल्या आहेत. इथे दोन नद्यांचा संगम, त्यांच्या वेगळ्या उठून दिसणाऱ्या प्रवाहांसोबत पहायला मिळतो. Between कादंबरी वाचून एका मित्राचा आज फोन आला. त्याच्या वाईट काळात साथ दिलेल्या प्रेयसीबद्दल बोलताना तो म्हणाला की "ती माझ्या आयुष्यात मल्हारसारखी आली." प्रेमाची भाषा अशी स्थळ काळ लिंग ओलांडून पोहोचते. कादंबरी घेण्यासाठी संपर्क New Era PublishingHouse 9373553349

3/1/24

नवीन कादंबरी

माझी नवीन येणारी कादंबरी कशाबद्दल आहे ? 
तर एका बावीस तेवीस वर्षाच्या, मीरा नावाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे.  अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.

या कादंबरीमध्ये मी या ब्लॉग वरचे अनेक तुकडे वापरले आहेत. कादंबरीमधील नायिका मीरा ही ब्लॉग लिहीत असते. फक्त ब्लॉगचे नाव मातीची मुलगी ऐवजी, विहिरीची मुलगी असे आहे. 

कादंबरीचे नाव - विहिरीची मुलगी.
प्रकाशक - New Era Publication, Pune
पृष्ठे 275
येत्या आठवडाभरात कादंबरी उपलब्ध होईल. 

2/27/24

मराठी भाषा बोलते म्हणून

मराठी भाषा बोलते ना,
म्हणून तर 
तुझ्या इतक्या प्रेमात आहे.
कदाचित मी जन्मले असते
दुसऱ्या एखाद्या प्रांतात,
मुखी असती दुसरी भाषा,
तर नसता दाटून आला 
इतका खोल खोल जिव्हाळा.
भांडत तंडत राहिले असते,
दिल्या असत्या खच्चून शिव्या.
पण तू मराठी बोलतोस,
मराठीचं लेणं अंगाखांद्यावर मिरवतोस.
आणि कोरडीठाक मी
तुझं मराठी ऐकून 
वळवाच्या पावसासारखी
पुन्हा पुन्हा कोसळत राहते
भान सुटून.

तुझ्याशी भांडता भांडता,
तुझ्या काळ्या भुईसारख्या 
निर्मितीच्या असंख्य शक्यता असलेल्या
मराठी बोलांनी
मनात गच्च गच्च 
आभाळ दाटून येतं.
यात तुझी काहीही हुशारी नाही.
अडीच टक्केसुद्धा नाही.
हा माय मराठीचा गोडवा.
ही मराठीच बांधते अगणित पूल
तुझ्या माझ्या, अनेकांच्या हृदयांमध्ये. 
हे भाषेचं देणं की
ओसाड माळरानासारख्या तप्त आयुष्यावर 
तुझे सगळे सगळे समजून उमजून घेणारे
मराठी बोल
वडासारखी गर्द सावली धरतात,
मला सावरतात, 
आंजारतात, गोंजारतात.

ही मराठीची थोरवी की
ही मराठी मला जगवते,
संघर्ष करायला आवाज देते,
आणि कोसळते तेव्हा 
ही मराठीच 
पुन्हा पुन्हा पोटाशी धरते,
आदिम करुणेने, मायेने
आणि थोपटत राहते
जिवाच्या अगणित काळज्या 
नाहीश्या होईपर्यंत.

हिचे नदीसारखे खळाळणारे
अंगाईगीत ऐकत ऐकत,
तू आणि मी,
द्वेषाच्या या काळयाकभिन्न आकाशाखाली
निश्चिंत मनाने पहुडून राहू,
ही मराठीच धुवून टाकेल 
सर्व भेदभावाच्या पाऊलखुणा.
बघ, सह्याद्रीच्या कड्यावर सूर्य उगवतोय.
- ऐश्वर्या.
#मराठीभाषागौरवदिन

4/9/23

प्रश्न बनून राहिलेल्या मुली

(पूर्वप्रसिद्धी साप्ताहिक साधना) तीन प्रश्न भेटले आहेत आत्तापर्यंत निरागस हास्य चेहऱ्यावर लेवून. एक – सप्टेंबर २०१६ उत्तराखंडमध्ये मी ‘आरोही’ या समाजसेवी संस्थेमध्ये काही दिवसांकरिता स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करण्याकरिता गेले होते. उत्तराखंडच्या, नैनिताल जिल्ह्यातील कुमाऊ भागात पहाडी गावांत, फिरत्या दवाखान्यातर्फे गर्भवती महिलांची तपासणी व उपचार करणे, नंतरच्या काळात तेथील दाईना बाळंतपणाचे प्रशिक्षण देणे, अशी जबाबदारी माझ्यावर होती. शेवटचे दहा दिवस मेडिकल ट्रेक होता. आम्ही चार डॉक्टर्स, चार स्वयंसेवक, एक फोटोग्राफर व आमचे लीडर पंकज सर, जे वर्षातून दोन वेळा स्व-खर्चाने हा ट्रेक आयोजित करतात, अशी आमची टीम जमली होती. बालेश्वर या गावापासून आणखी पुढे जाऊन एका पहाडावरील रिसोर्टमधे आम्ही पहिल्या रात्री मुक्काम केला. रोज सकाळी सातलाच ट्रेक सुरु करायचा, अकरापर्यंत गावात पोहचायचे, तिथे कॅम्प लावून रुग्ण तपासणी करायची. छोटे गाव असेल तर जेवून आणखी पुढच्या गावी जाऊन तिथे पुन्हा कॅम्प लावायचा व मग मुक्कामाच्या ठिकाणी जायचे असा दिनक्रम होता. कधी गाव खूप दूरवर असले तर मग एकाच गावी जाणे होयचे. कधी गावातील शाळेत सर्व वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्यतपासणीसाठी जायचो. आम्ही डॉक्टर्स आरोग्य तपासणी करत असताना, बाकी स्वयंसेवक मुलांसाठी चित्रकला, वेगवेगळे खेळ असे प्रकार घ्यायचे. खूप मजा यायची आणि ट्रेकिंगने थकायलाही होऊन जायचे. रात्री थकून भागून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचो. पहाड चढताना प्रत्येकाची चालण्याची गती वेगवेगळी असायची. कोणी वेगाने जायचे, तर कोणी संथ. माझा हा पहिलाच हिमालयीन ट्रेक असल्याने आणि इतक्या उंचीवरच्या ट्रेकिंगची सवय नसल्याने मी सर्वात मागे असायचे. अशीच एकेदिवशी शाळेतील तपासणीनंतर मी एकटीच पहाड उतरणीच्या रस्त्याला लागले होते. शाळा सुटली होती. सर्व पोरे पोरीही त्याच रस्त्याने निघाले होते. पहाड उतरून गेले की त्यांचे गाव होते. आमचाही मुक्काम तिथेच होता. त्यातील एक चुणचुणीत, आठ वर्षांची पोट्टी माझ्यासोबत चालू लागली. आमची मग दोस्ती झाली. मी दमले आहे, हे लक्षात येऊन ती व तिच्या आणखी इटुकल्या मैत्रिणी माझी पाठीवरची bag मागू लागल्या. “दीदी, bag हमे देदो, आप थक जाओगे.” मला हसू आले आणि कौतुक पण वाटले त्यांच्या काळजीचे. खाली उतरून गेल्यावर अक्रोडाची दोन-तीन मोठी झाडे लागली. सर्व पोरे-पोरी अक्रोड वेचू लागले. शोधून, दगडाने फोडून खाऊ लागले. माझी छोटी मैत्रीणही त्यात सामील झाली. मी उभी राहून कौतुकाने ते पाहत होते. तर ती पोरगी सारे अक्रोड गोळा करून मलाच आणून देऊ लागली. मी नको म्हणतेय तरी जबरदस्तीने माझ्या bag मध्ये टाकू लागली. बाकीच्या पोरांनाही मग मला अक्रोड द्यायला म्हणून रागावू लागली. अशारितीने भरपूर सारे अक्रोड गोळा झाले माझ्याकडे. मग आम्ही दोघी परत रस्त्याला लागलो. तिचे घर लागले, तसे मी तिला म्हटले, “तू दप्तर ठेऊन ये. आपण फिरायला जाऊ.” मीही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. थंड पाण्याने आंघोळ करून ताजीतवानी झाले. तेवढ्यात ती आलीच मला शोधत. मग आम्ही दोघीही गावात फेरफटका मारायला गेलो. एक लहानसे दुकान दिसले. तिच्या प्रेमाखातर मला तिला काहीतरी देऊ वाटत होते. त्या दुकानातून टूथपेस्ट, ब्रश, तेल, कंगवा, साबण अशा तिला रोज लागणाऱ्या वस्तू, काही बिस्किटे, थोडे चॉकलेट असे सामान तिला घेऊन दिले. ती खुश दिसली. मलाही तिचा आनंद पाहून समाधान वाटले. मग तिला मी घरी सोडवायला गेले. तिच्या घरात काही अक्रोड होते, तिला तेही मला द्यायची इच्छा होती, म्हणून ती पळत घरात शिरली. मी बाहेरच अंगणात थांबले. ती अक्रोड घेऊन बाहेर आली. तिच्यामागे आणखी लहान लहान मुले आली. तिचे अक्रोड माझ्या bag मधे ठेवत मी तिला विचारले, “कोण कोण आहे तुझ्या घरी ?” तेव्हा कळले, ती सर्वात मोठी मुलगी घरातील. तिला २ छोट्या बहिणी आणि २ छोटे भाऊ. असे ते पाच लोक. तिच्या मागे दूरवर उभे राहून, फाटक्या कपड्यातले ते बहिण भाऊ माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. मी दिलेल्या सामानाची पिशवी घेऊन ती हसतच तिच्या भावंडाकडे गेली. त्या पिशवीत मात्र एकच ब्रश, एकच साबण होता. ते तिला स्वतःला तरी किती दिवस पुरणार होते ? तेथून परत येताना, त्या फाटक्या कपड्यातल्या भावंडांचे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हते. तेव्हा मला माझ्या त्या मुलीला त्या वस्तू घेऊन देण्यातील क्षणभंगुरता लक्षात आली. त्या रात्री, त्या पहाडी गावामध्ये, मी डायरीत लिहित राहिले, “पहाडातील या सर्वात दुर्लक्षित राहिलेल्या मुलीसाठी काय करू शकते मी ? दर वर्षी इथे असेच ट्रेकिंग करत यावे की सर्व सोडून कायमचे येऊन रहावे इथे ? की वर्षातील एक महिना नित्य नेमाने इथे येत जाऊन काहीतरी काम करावे या मुलींसाठी ? काय करू शकते मी या मुलीसाठी ?” हसऱ्या चेहऱ्याने मला निरोप देणारी ती अक्रोडवाली मुलगी कायमची प्रश्न बनून रुतून बसली आहे माझ्या मनात आणि आठवत राहते दररोज. दोन - फेब्रुवारी २०१८ पुणे रेल्वे स्टेशनवर मी वैतागून उभी होते. उद्यान एक्स्प्रेसची पावणे अकराची वेळ होती आणि ट्रेन दोन तास उशिराने येणार होती. त्या दोन तासात दमायला झाले वाट बघून. शेवटी एकदाची एक वाजता ट्रेन येण्याची सूचना आली व bag घेऊन मी फलाटावर उभी राहिले रूळाकडे डोळे लावून. एक भिकारीण, तिच्या दोन-तीन पोरा-टोरांसोबत भीक मागत माझ्यासमोर आली. भिकाऱ्यांना भीक द्यावी की नको या प्रश्नावर मनात खूप काथ्याकुट करूनही अजून त्याचे निश्चित उत्तर मला सापडलेले नाही. त्यामुळे ते काम मी मूडवर सोपवते. पोरे असलेली बाई, म्हणून त्या बाईच्या हातावर काही पैसे टेकवले. ती पुढे निघून गेली. पण तिच्या सोबतची फाटक्या मळक्या कपड्यातील पोर माझ्यासमोरच थांबली. “मुझे भी दो.” ट्रेन येण्याकडे लक्ष असणाऱ्या माझी चिडचिड झाली, “आगे जाव.” मी रागाने तिच्याकडे पाहत बोलले. तिने हट्टाने मान मुरडून, “उंहू” केले. ती सहा-सात वर्षे वयाची शेंबडी पोर पाहून मी विरघळले. मनात विचार आला, माझा भाचा जेव्हा काही मागतो, तेव्हा मी लाडाने त्याला देते. ही सुधा तर छोटी पोरच आहे. इतक्या कोवळ्या जीवाला मी भिकारी या चष्म्यातून पाहून हिडीस फिडीस करणे योग्य आहे का ? मग सावकाशपणे मी पर्स उघडली. चिक्कीचे पुडे ठेवलेले होते, ते तिला देऊन टाकले. खुशीने ते घेऊन ती पुढे गेली. पाच मिनिटांनी मी पुन्हा तिच्याकडे पहिले. दूरवर गेलेली ती अजूनही तो पुडा दाताने उघडायचा प्रयत्न करत होती आणि दुरूनही माझ्याकडे पाहत होती. मी विचारात पडले. समाजात अशा स्टेशनवर फिरणाऱ्या, बालपण उपभोगण्याऐवजी भिक मागत फिरणाऱ्या या मुलींप्रती माझी काय जबाबदारी आहे ? मीही हिच्या या परिस्थितीला, हिच्या ‘भिकारी असण्याला’ समाजाचा एक भाग म्हणून काही अंशी तरी नक्कीच जबाबदार आहे. हिच्यासाठी मी काय करू शकते ? असा हा रेल्वे फलाटावर भेटलेला शेंबडा आणि हट्टी प्रश्न. त्याला हुसकावले तरी ‘उंहू’ करत बसून राहतो मानगुटीवर. तीन. कुटरु अनाथालय. मार्च, २०१८. छत्तीसगड. बिजापूर जिल्हा. भैरमगड प्रभाग. कुटरु खेडे. त्यातील पंचशील नावाचा अनाथाश्रम. दहा एक वर्षांपूर्वी झालेल्या नक्षलवाद्यानविरुद्ध आदिवासींनी केलेल्या सशस्त्र लढ्यामध्ये मारल्या गेलेल्या आदिवासींच्या अनाथ मुला-मुलींसाठी ‘मधुकर राव’ या आदिवासी नेत्याने बनवलेला हा आश्रम. रविवारी या गावात मी तेथील रूग्णालयामधे गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी गेले की मुलींच्या आश्रमात चक्कर होतेच. अधीक्षकांची विनवणी असते की तेथूनच काही अंतरावर असलेल्या मुलांच्या आश्रमालाही भेट द्या. पण मुलींकडून पायच निघत नाही आणि अजून मी मुलांच्या आश्रमाकडे फिरकलेही नाही. माझा मुंबईवरून मित्र आला होता मकरंद दीक्षित, त्याने माझ्या या मुलींना ओरिगामी शिकवले. दोनवेळा कुटरुला गेला, दोन्ही वेळी मुलींच्याच आश्रमात. मुलांकडे नाहीच. मुली जीवच लावतात तितका. मधे महिनाभर रजा घेऊन काही कामानिमित्त मी महाराष्ट्रात, गुजारतमधे गेलेले. परत आल्यावर बिजापुरच्या जिल्हा रुग्णालयातच व्यस्त. त्यामुळे सलग दीड महिना जाणेच झाले नाही आश्रमात मुलींकडे. परवा होळी झाली, सारेजण रंग खेळले. मी मात्र चिंताग्रस्त. डोक्यात नुसती चिंता, तणाव. खेळूच वाटले नाहीत रंग. आपल्याला कोणीच नाही अशा एकटेपणाच्या विचित्र जाणीवेने पुरे घेरून टाकले होते. यावर्षीची होळी बिनारंगांची गेली म्हणून अजून नाराजी. मुलींची आठवण आली म्हणून मधुकर रावांना फोन केला की मी या रविवारी येते तिकडे म्हणून. आज गेले तर मुली खुशीने धावतच आल्या. येऊन, प्रणाम म्हणत वाकून पायाला नमस्कार. मी नको नको म्हणेपर्यत वाकल्यासुधा. बाकीच्यांना म्हटले, “झुको मत. गले लगो.” मग गळाभेट झाली. पाहिले तर मी येणार म्हणून मुलींनी आज पुन्हा एकदा रंग खेळायची पूर्ण तयारी करून ठेवलेली. कपाळावर ‘टीका’ लावायला ताटात रंग काढलेले, पाण्याने बादल्या भरून ठेवलेल्या. “आज दीदी के साथ रंग खेलना है” म्हणत कोणी अंघोळी पण नव्हत्या केलेल्या. मी आश्चर्याने सर्दच ! मनात रिकाम्या हाताने आल्याची खंत, गडबडीत मिठाई आणायची विसरूनच गेलेले. मग मुलींना, त्याच्या तरुण उत्साही शिक्षिकांना हळूहळू शांत केले. म्हटले, अजून दोन दिवसांनी रंगपंचमी येते आहे, तेव्हा मी रुग्णालयाचे काम संपवून दुपारी येईन, आपण मिठाई खाऊ, कोल्ड्रिंक पिऊ, मग रंग खेळू, मस्त गाणे लावून साऱ्याजणी नाचूया रात्र होईपर्यंत. रात्री मी इथेच राहीन. पकोडे करू रात्री. असा सर्व कार्यक्रम ठरवला, तेव्हा कुठे मग सारे शांत झाले. माझे मन आनंदाने भरून आले. हे वर्ष अंगाला रंग लागला नाही, म्हणून खंतावले होते मी. पण या वेड्या मुलींनी माझी तीही हौस भागवली, या अनाथ मुली मुक्त हस्ताने प्रेम देताहेत मला. त्यांचा रंग खेळून झालाय परवाच, पण माझ्यासाठी मधुकर राव पुन्हा एकदा परवानगी देत आहेत मुलींना रंग खेळायला. खूप कृतज्ञ वाटले मधुकर राव आणि या मुलींप्रती. बाहेर ऊन असल्याने आम्ही हॉलमधेच मोठ्ठे रिंगण करून बसलो होतो. परीक्षा चालू असल्याने १०-१२ वीच्या मोठ्या मुली अभ्यास करत होत्या. आम्ही बाकी सारे मग बैठे खेळ खेळलो. खेळताना नियम मोडले जात होते, चीटिंग चालू होती आणि मला गम्मत वाटत होती, त्यांच्यासोबत पुन्हा लहान होण्याची. एक सात वर्षाची मुलगी पळायला उठली आणि तिचा एका बाजूचा पूर्ण फाटलेला फ्रॉक मला दिसला. मनात कुठेतरी हलले. त्यांना खेळण्यात सोडून मी उठून त्यांच्या शिक्षिकेकडे गेले, किती कपडे मिळतात, कोण देते वगैरे. “बच्चे है, तो खेलते खेलते, फट जाते है कपडे.” बरोबरच होते ते. त्या चिमुकल्या अनाथ मुलींना कसे कळावे की मिळणारे अपुरे कपडे नीट जपून वापरावेत म्हणून. मनात आले, होळीनिमित्त त्या सर्वाना कपडे घेऊन द्यावेत. पुन्हा मनात तोच विचार, तू घेऊन दिलेला एक एक कपडा किती दिवस पुरणार आहे त्यांना ? येताना त्यांना विचारले, “कौनसी मिठाई लावू ?” एकीने हक्काने सांगितले, “दीदी, गुलाब जामून लावो, मुझे बहोत पसंद है.” म्हटले, “ठीक है.” सर्वांचा निरोप घेऊन बिजापुरला जायला परत निघते मी, मनात रंगपंचमीचा कार्यक्रम आखत. त्यातील एक नऊ वर्षाची मुलगी मला फार आवडते, सरिता. नेहमी मी गेले की पाणी आणून देणे, मला सर्व फिरवून दाखवणे, फोटो काढणे, अशी कामे करणारी चुणचुणीत मुलगी, शांत समंजस. मनात येते, मी हिला दत्तक घेऊ शकते का ? पण हिला इथून, तिच्या जन्म स्थळापासून दूर महाराष्ट्रात नेणे योग्य होईल का ? मी तिला खरीखुरी माया देऊ शकेन का ? की नाहीतर मीच कायमसाठी राहून जावे इथे कुटरुमधे या मुलींसोबत. पण मी इतकी समर्थ आहे का, इतका मोठा निर्णय निभवायला? डोक्यात नुसते प्रश्न. मुलींचे मिळणारे भरभरून प्रेम, माझ्या एकटेपणाला पळवून लावणारे. साऱ्या जगावर नाराज होऊन अंगाला रंग न लावून घेणारी मी त्यांच्या प्रेमाच्या रंगात अंतर्बाह्य रंगून जाते नकळतपणे. अजूनही मी फक्त घेतच आहे त्यांच्याकडून. ते त्यांना परत कशी देऊ ? या सर्वाची परतफेड कशी करायची ? त्यांच्यासाठी मी काय करू शकते ? हा तिसरा प्रश्न.

3/29/23

“वादळात चालताना तू माझा रे सांगाती..”

(पूर्व प्रसिद्धी चतुरंग, पुरवणी लोकसत्ता) घरातून बाहेर पाय ठेवल्यापासून विविध ठिकाणी, विविध क्षेत्रांत पुरुषांचे इतके वाईट अनुभव येत राहतात, की कधीकधी मग सर्वांचीच भीती वाटू लागते, चांगुलपणावरचा विश्वास संपू लागतो. काम करण्याची उमेद मावळते. मन निराश होऊ लागते. अशावेळी प्रत्येकीच्याच आयुष्यात असे काही खास, जवळचे पुरुष वेगवेगळ्या रुपात असतात, की ज्यांच्यामुळे पुन्हा आत्मविश्वास येतो, स्वतःला रिचार्ज करण्याचे जणू ही उर्जाकेंद्रे असतात. थकून यांच्याकडे जावे, यांनी पाठीवर हात ठेवून बळ द्यावे आणि आपण पुन्हा झेप घ्यायला तयार व्हावे. मुलीच्या आयुष्यातील सर्वात पहिला आणि सर्वात जवळचा पुरुष म्हणजे वडील. माझ्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे त्याच्याशी वाद घालण्यात, बंड करण्यात गेली. वाढत्या शाळकरी वयात मग त्यांचे वैज्ञानिक प्रयोग शिकवणे, नवीन गोष्टी शिकायला, प्रयोग करायला प्रोत्साहन देणे, यातून आपले वडील कुठेतरी इतर वडील लोकांपेक्षा वेगळे आहेत, हे जाणवले आणि थोडासा राग निवळला. वेगवेगळ्या गावी, विज्ञानप्रयोग प्रदर्शनांसाठी हौसेने ते घेऊन जायचे, कधी पुण्याला, कधी महाडला, कधी मुंबईला, लहानपणी त्या सर्वाचे फार अप्रूप वाटायचे. असेच दहावीमध्ये एकदा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी पपा मला सोलापूरला घेऊन गेलेले आणि परीक्षा हॉलमध्ये जायच्या आधीच अचानक मला मासिक पाळी सुरु झाली. तेथील गलिच्छ स्वच्छतागृहातून मी तशीच रडत बाहेर आले, शरमेने हळू आवाजात पपांना सांगितले. असे काही त्यांना सांगण्याचा आयुष्यातील पहिलाच प्रसंग, मला वाटले, परीक्षा सोडून घरी जावे लागणार. तर पपा म्हणाले, “त्यात काय एवढे, हा घे कपडा,” आणि सहजपणे त्यांनी स्वच्छ पांढरा शुभ्र रुमाल खिशातून काढून दिला. धीर देऊन मला पुन्हा परीक्षाहॉलमध्ये पाठवले. इतकी छोटीशी गोष्ट, पण माझ्या हळव्या मनावर तो प्रसंग कायमचा उमटून गेला. “हा माणूस नेहमी खंबीरपणे पाठीशी उभा असेल आणि मला मुलगी म्हणून कधी कमीपणाने वागवणार नाही”, हे त्या वयातही अबोध मनात जाणवले. घरामध्ये आई नोकरी करणारी असेल, तेव्हा बापाला कामाचा भार उचलावाच लागतो. अजूनही आपल्या so called modern जगातही, उच्चशिक्षित लोकांना पुरुषाने स्वयंपाक करणे कमीपणाचे वाटते. परंतु अगदी १९९०च्या काळापासून, माझे वडील घरातील सर्व जबादारी मोकळेपणाने उचलायचे. नेहमी आनंदी चेहऱ्याने कधी नाश्ता तर कधी भाजी बनवणारे पपा ‘पुरुषाने स्वयंपाक बनवण्यात’ कधीच कमीपणा मानत नाहीत. सुरुवातीला नातेवाईकांचे, कौटुंबिक मित्र-मैत्रिणींचे कितीतरी टोमणे झेलावे लागले की नवरा कसा काय स्वयंपाक बनवतो. पण लोकांसमोर पपांनी नेहमीच ठामपणे उत्तरे दिली की ‘माझी बायको जशी नोकरी करून माझ्याएवढीच कमावते, तर माझी पण जबाबदारी बनते, की मीही मोकळ्या वेळात घरची जबाबदारी उचलावी.’ अजूनही लोक बोलतात आणि अजूनही पपा त्याच सहजपणे उत्तर देतात. बारावीच्या परीक्षेच्या वेळी, मला अतिताणाने रडू यायचे, तेव्हाही त्यांनी प्रेमाने समजावले की परीक्षेतील यश हेच काही सर्वकाही नसते, जेवढे झेपेल तेवढेच कर. MBBS नंतर बंडखोरीतून केलेल्या, माझ्या आंतरजातीय प्रेमविवाहाला मोठ्या मनाने समजून घेऊन स्वीकारणारे पपा, काही वर्षांनी घटस्फोटानंतरही तितक्याच समजूतदारपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. जगाचे टक्केटोणपे खात असताना, “तू काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत.” असे म्हणून त्यांनी नेहमीच मला मायेने सावरले. अनेकदा नातेवाईक, ओळखीचे लोक तगादा लावतात, की हिचे लग्न कधी करणार. मीही कधी लोकांच्या चौकशीने भांबावून जायचे, तेव्हा माझे पपा मात्र खंबीरपणे म्हणाले, “तू माझ्यासाठी मुलाप्रमाणेच आहेस. कधीच स्वतःला कमी समजू नकोस. तू समाजपयोगी काम करते आहेस, तेच आयुष्यात सर्वात महत्वाचे आहे. लग्न म्हणजे काही सर्वस्व नाही. तुला अनुरूप मुलगा मिळेल, तेव्हाच लग्न कर.” अशा या जगावेगळ्या वडिलांच्या पाठिंब्यामुळे आपोआपच मीही आत्मनिर्भर झाले, माझी निर्णयक्षमता सक्षम बनली, स्वतःवरचा गमावलेला विश्वास या माणसाने मला परत मिळवून दिला. काही दिवसांपूर्वीच माझे ऑपरेशन झाले तर माझ्या खाण्यापिण्याची सारी जबाबदारी, न सांगता, पपांनी स्वतःवर घेतली. फळांचे जूस, भाज्यांचे सूप, सारेकाही खुशीने, नवीन नवीन प्रयोग करत माझ्याशी गप्पा मारून, माझे टेन्शन हलके करत, मला बरे करणे, हे त्यांचे कामच होऊन गेले. कोणी तब्येतीचे विचारले, तर मी अभिमानाने सांगते, “माझे पपा आहेत ना, ते माझी खाण्याची सर्व पथ्ये पाळतात, त्यामुळे लवकर बरी झाले मी.” लहानपणी पपांचा मार खाल्लेल्या मला त्यांचे हे बदलेले रूप पाहून आश्चर्य वाटत राहते. लहानपणी रागात बनलेल्या मनाच्या निरगाठी सैलावत जातात. घरातील जबाबदारी घेण्यासोबतच, त्यांचे सामाजिक कामही चालूच असते. पूर्वी NSS सोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत गावा-गावात काम करणारे माझे प्राध्यापक वडील मी जवळून पाहिले आहेत. त्याकाळात गावात स्वच्छता मोहीम राबवणारे, लोकांना उघड्यावर शौचास करण्याचे तोटे सांगून जनजागृती करणारे, प्रसंगी कॉलेजच्या मुलांना घेऊन, उघड्यावरची घाण स्वतः उचलून, विल्हेवाट लावणारे पपा, त्यांच्यासोबत मलाही अशा शिबिरांना घेऊन जायचे. कदाचित त्याचा परिणाम असेल, त्यामुळे मलाही आधीपासूनच गावात जाऊन लोकांसोबत काम करण्याची आवड निर्माण झाली. स्वयंपाक कधी शिकवला नाही, परंतु हातचलाखीच्या जादू शिकवून, स्टेजवर जाऊन माझ्याकडून त्या करवून घ्यायचे. आज मला जाणवते, माझ्या व्यक्तिमत्वातील कितीतरी गोष्टी या माणसाने माझ्याही नकळत घडवल्या आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या ‘मुलां’शी मैत्रीला विरोध असणारे पपा आता मात्र याबाबतीतही बदलले आहेत. उलट आजकाल माझ्या मित्रांसोबत त्यांच्याही छान गप्पा होतात. कधी चिकन बिर्याणी बनवून ते आम्हाला सर्वाना खाऊही घालतात. माझ्या कामाच्या ठिकाणी, छत्तीसगडमध्ये येऊन काम पाहणे, लोकांना भेटणे, हे सर्व त्यांना मनापासून आवडते. मी प्रचंड स्त्रीवादी आहे, त्या दृष्टीने, माझ्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवणारे, मला निवडीचे स्वातंत्र्य देणारे, मला वेगळ्या कामासाठी प्रोत्साहन देणारे आणि बाहेरच्या कामासोबत, घरातील जबाबदारीही उचलणारे माझे वडील मला स्त्रीवादीच वाटतात. अजूनही कधी “पपांनी स्वयंपाक बनवला” हे ऐकून माझ्या एखाद्या मित्राचा घास आश्चर्याने घशात अडकतो, तेव्हा मी अभिमानाने सांगते, “माझे पपा feminist आहेत.” अनेकवेळा नोकरीमध्ये वाईट अनुभव आल्यामुळे, कामाच्या ठिकाणी लोकांच्या बाबतीत माझा दृष्टीकोन नकारात्मक झाला होता. सुरुवातीला कोणी कितीही चांगले वागले तरी काही दिवसांनी त्या माणसाचे खरे रूप बाहेर येते, असा गेल्या काही वर्षातील अनुभव. पुरुष तर आणखी जास्त भयंकर अनुभव देणारे. त्यामुळे सध्याच्या नवीन हॉस्पिटलमध्येही सुरुवातीला भुलून न जाता, डोळे उघडे ठेवून काम करण्याची माझी धडपड. नवीन जागी रुळण्याची काळजी, कामाचे टेन्शन, विविध तणाव. येथे भेटलेला बॉस. पहिल्यादिवशी त्यांना भेटले, तेव्हा वाटले नव्हते की या माणसाची फारशी काही मदत होईल. परंतु मग पुढच्याच काही महिन्यात लक्षात आले, की या माणसाची साथ-सोबत आहे प्रत्येक गोष्टीत. मग ती हॉस्पिटलमधील काही समस्या असो किंवा कधी वैतागाने, निराशेने माझे रडणे असो. कधी पळून जायचा प्रयत्न करावा, तर तो आहेच खंबीरपणे उभा, समस्येचे उत्तर घेऊन आणि “पळून जायचे नाही” हे ठामपणे सांगायला. यापूर्वीच्या कामामध्ये मी अनेकदा समस्यांना वैतागून पळालेली आहे. यावेळेस मात्र हा पाठीराखा आहे, समस्या सोडवायला. उलट जबाबदारी देऊन, मला समर्थ, परिपक्व होण्यास मदत करायला. माझ्या घटस्फोटाबद्दल त्याला माहित होते, परंतु त्या गोष्टीचा उच्चारही कधी त्याने माझ्यासमोर केला नाही किंवा मला अस्वस्थ वाटेल, असे खाजगी आयुष्याचे प्रश्न विचारले नाहीत. उलट मीच एकदा निराश झालेले पाहून त्याने समजावले, घटस्फोट वगैरेचा काही फरक पडत नसतो. इतके चांगले काम करते आहेस. मस्तपैकी खुशीने जग.” त्याच्या शब्दांनी, कामाच्या केलेल्या कौतुकाने आपोआपच मला बळ आले. त्या एकाच प्रसंगानंतर माझा घटस्फोट ही गोष्ट कधीच आमच्या बोलण्यात चुकनही आली नाही. कामात एखादी नवीन कल्पना सुचली की त्याला सांगायचा अवकाश, त्याने ती कल्पना प्रत्यक्षात राबवायला प्रोत्साहन द्यावे. वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन, नियोजन करायला शिकवावे. कधी ताण-तणावाने मी रडकुंडीला आले, तर त्याने नवीन काहीतरी लिखाण-वाचन सुचवावे. आपोआपच त्याच्यामुळे मी लिखाणाकडे वळले. माझे लिखाण नवीन जोमाने सुरु झाले, छंदाचे रुपांतर जबाबदार, शिस्तशीर लिखाणात झाले. एका साप्ताहिकात मी नियमित स्तंभ लिहू लागले. त्याचे हे पाठबळ फक्त माझ्यसाठीच नाही, तर सर्वच डॉक्टरांसाठी होते. तो सर्वांसाठीच होता, तरीही गर्दीत तो प्रत्येकाला आपला जवळचा मित्र वाटावा, असा त्याचा सर्वाना सामावून घेणारा स्वभाव. त्याच्या मनाचा मोठेपणा पाहून, स्वतःच्या कोतेपणाची लाज वाटावी. कधी कोणाशी भांडण झाल्यावर त्याने समजवावे, की मन मोठे करावे म्हणून. स्त्रीला आदर कसा द्यावा, हे तर त्याच्याकडूनच शिकावे. त्याच्या बायकोला, बाळाला नेहमीच प्रेमाच्या पंखाखाली सांभाळणारा तो. माझ्यासारख्या एकट्या मुलींना अशा भागात राहताना किती समस्या येतात, हे समजून घेऊन नेहमी मदतीसाठी तो तत्पर. आमच्या मैत्रीत किंवा कधीही कुठल्या मुलीशी बोलताना त्याची नजर ढळली नाही, उलट तो इतका उमदा, हसतमुख की मुलीची नजर त्याला लागावी. कधीही बोलायला त्याच्या घरी जावे आणि कितीही व्यस्त दिनक्रमातूनही, थकलेले असतानाही त्याने निवांत गप्पा माराव्यात. त्याच्याशी बोलले की मनावरचा भार हलका होऊन जावा. घर सोडून, छत्तीसगडमध्ये येताना, नेहमीच ‘तो’ आहे म्हणून इतक्या दूरवरही अतीव विश्वासाने येता यावे. असा ‘तो’ माझा मित्र, माझे प्रेरणास्थान, माझा मार्गदर्शक, माझा पाठीराखा. इतके विश्वासाचे नाते. दोन्ही बाजुनी खूप नाजूकपणे, आदराने जपलेले. असा हा जगावेगळा बॉस. मोठ्या हुद्द्यावर असणारा, परंतु पाय मात्र जमिनीवरच असलेला. आजूबाजूला इतकी खुजी माणसे पाहते, जी थोडीफार सत्ता मिळताच, गुर्मीत वागतात, अधिकारपदाचा माज दाखवतात, जवळचे असले तरी वागणे बोलणे बदलते. छोट्या कामासाठीही मग आडकाठी लावून धरतात, नमस्कार चमत्कार करवून घेतात. परंतु हा मात्र वेगळ्याच मातीचा बनलेला माणूस, माणुसकी जपणारा, प्रामाणिक, व्यवहारात शिस्त, मात्र कुठेही विनाकारण कठोरपणा नाही, चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य, सोबतच्या अधिकाऱ्यापासून गावातील आदिवासी मनुष्यासोबही तितक्याच संवेदनशीलतेने, आपुलकीने बोलेल. स्वतःच्या वागण्यातूनच लोकांसमोर वेगळे उदाहरण ठेवणारा अधिकारी. त्याच्याशी कितीही मतभिन्नता झाली, राग आला तरी तो लगेच निवळायचा, कारण अनुभवाने कळून चुकले होते, की तो जे करतो, ते सर्वांच्या हिताचा विचार करूनच करतो. माझ्या चुका झाल्या, तेव्हा त्यांच्या शिस्तीने मला शिक्षाही मिळाली. पण मग नंतर मोठ्या मनाने त्यांनी ते माफही केले. त्यांच्याकडून कितीही गोष्टी शिकले, तरी कमीच आहे. कधी प्रवासात समस्या यावी, अनोळखी प्रदेशात भीती वाटावी आणि त्यांना फोन करताच त्यांनी काळजीने, तातडीने मदत करावी. मला गावातील स्त्रियांसाठी काम करायला आवडते, हे पाहून त्यांनी मला ‘कुटरु’ या खेड्यात कामासाठी पाठवले आणि येथील स्त्रियांशी, लोकांशी माझे विश्वासाचे नाते जुळले. कुटरुमधील पंचशील आश्रमात त्यांनी जायचा सल्ला दिला आणि या अनाथालयात मला नेहमीच मुलींचे प्रेम मिळाले. अजूनही कामाचा ताण येतो, तेव्हा श्रमपरिहारासाठी मी कुटरुला धाव घेते. असा हा दयाळू मनाचा, दुर्मिळ अधिकारी. ३१ डिसेंबरला, स्वतःच्या हाताने मटणाची स्पेशल डिश बनवून सर्व आम्हा सर्व डॉक्टरांना प्रेमाने खाऊ घालणारा. रात्री १२ वाजता, स्वतः प्रत्येकाच्या हातात फटाके, फुलबाजे, बाण नेऊन उडवायला सांगणारा. जिथे जिथे तो जाईल, तिथे तिथे आनंद वाटणारा. मी पाहत राहते आश्चर्याने आणि त्याच्या छत्राखाली सुरक्षित, आनंदी आयुष्य अनुभवत राहते विश्वासाने. तो दूर जाताना डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या. असे वाटले, माझी आयुष्याची दिशा हरवेल आता. पण कधीतरी मला तो आधार सोडावाच लागणार होता. स्वतःचा रस्ता स्वतःलाच शोधावा लागतो शेवटी. असे वाटते, त्याच्यासारखे बनता यावे. शेवटी त्याला हक्काने सांगता यावे, “वादळात चालताना तू माझा रे सांगाती..”

3/28/23

शब्द

शब्दच मांडतात छळवाद आणि शब्दच करतात सुटका.
अनेक वर्षांपासून मानगुटीवर बसून राहिलेली पाप पुण्याची भुतं शब्दांच्याच मदतीनं उतरतात अलगद खाली आणि घेता येतो मोकळा श्वास.
परतत्वाचा स्पर्श होतो..आणि सरसर झरतात काळजाचे शाप कागदावर शब्दांच्या रुपात...होते कधी कविता..कधी कथा..कधी नुसताच जीवाचा तळतळाट.... 
ज्या कोणी माझ्या हाती लेखणी देऊन मला लिहितं केलं त्याला/तिला माझे कोटी कोटी नमस्कार.....
लिहिणं मला मुक्ती देतेय साऱ्या खऱ्या खोट्या हिशोबातून... प्रामाणिक जगण्यासाठी आणखी काय हवं.